प्रकृती नुसार विकासाचा मार्ग

प्रकृती नुसार विकासाचा मार्ग

प्रत्येक व्यक्तिची प्रकृती भिन्न आहे, स्वतंत्र आहे, त्यानुसार त्याच्यातल्या सुप्त क्षमतांचा समुच्चय ही भिन्न आहे, स्वाभाविकच त्याची विकासाची प्रक्रिया, गती व निकषही स्वतंत्र आहेत. म्हणूनच पूर्णत्व प्राप्तीचे मार्गही असंख्य आहेत. योगामध्येही ढोबळ मानाने प्रमुख मार्ग ज्ञान मार्ग, म्हणजे तर्काच्या आधाराने जीवन जगत परिपूर्ण जीवनाची अभिव्यक्ती साधण्याचा मार्ग, भक्ती मार्ग म्हणजे पूर्णत्वाच्या अभिव्यक्तीसाठी आपल्या भाव भावनांना अनुरूप आराध्याचे आलंबन स्विकारून मार्गक्रमण करणे, कर्ममार्ग म्हणजे आपल्या कर्मांना तन्मयतेने करत स्वत:चे पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे आणि हठयोग किंवा राजयोगाच्या माध्यमातून आपले शरीर व मन इतके परिष्कृत व निर्दोष बनवणे की ज्यामुळे सर्व सुप्त क्षमतांचा विकास होऊन पूर्णत्व प्राप्त होईल. या चार प्रवाहांच्या कमी अधिक प्रमाणानुसार (Permutations and combinations) असंख्य विकल्प उपलब्ध होतात. ज्यातून व्यक्तीने आपला मार्ग निवडून विकास साधावा अशी भारतीय धारणा आहे.

शिवमहिम्न स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे
“ऋचिनां वैचित्र्याद् ऋजुकुटिल नाना पथजुषां, नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्ण इव’’ 
ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे आपापल्या रुचीप्रमाणे वाटचाल करणारे सर्वजण एकाच सत्याकडे जातात.’

अष्टांग योग

योगशास्त्राला अतिशय प्राचीन परंपरा आहे. श्वेताश्वतर उपनिषदात योगाचे लाभ सांगतांना 
“न तस्य रोगो न जरा न मृत्यु” असे वर्णन केले आहे. महाभारतात योगाचा प्रारंभ सांगतांना 
“हिरण्यगर्भो योगस्य वक्ता, नान्य: पुरातन” असा उल्लेख आहे. गीतेमध्येही विस्ताराने योगाचे विवरण आहे. या प्राचीन परंपरेला पतंजली मुनींनी संकलित व सुत्रबद्ध रुपात संपादित केले.

 

Vote: 
No votes yet
Language: