बदललेल्या जीवनशैलीमध्ये योगाची उपयुक्तता 11

योगशास्त्राचे उपचारास अत्यंत सुलभ, स्वस्त व कुठेही उपलब्ध होऊ शकणारे तंत्र, त्याची परिणामकारकता लक्षात घेता, आजच्या समस्यांवर मात करण्यासाठी व्यापक प्रमाणावर अंगिकारण्याची गरज आहे.
समाजातही योगाकडे पाहाण्याच्या दृष्टीत स्वागतार्ह बदल होतांना दिसतो आहे. पण योगाचे प्रशिक्षण, योगिक उपचारव संशोधन या संदर्भात काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. विविध व्याधींसाठी विविध योग प्रणालीत विशिष्ट योगाभ्यास सांगितलेले आहेत. त्यांचा जसाच्या तसा अवलंब करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने स्वत:चे वय, शरीरस्थिती, आजाराची तीव्रता, आजाराचा कालावधी इ. ची माहिती तज्ञांना देऊन त्यानुसार स्वत:साठी योग्य असा योगिक अभ्यासक्रम समजून घ्यावा व तो तज्ञ मार्गदर्शकाकडून शिकून घ्यावा. पुस्तक वाचून, दूरदर्शन वरील कार्यक्रम अथवा चित्रफीत पाहून योग शिकणे, करणे अशास्त्रीय व चुकीचे आहेच, पण प्रसंगी ते हानिकारकही ठरू शकते. कारण जसे योग्य पद्धतीने केल्यास योगामुळे लाभ होतात, तसेच चुकीच्या पद्धतीने केल्यास अपायही होऊ शकतो.
आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन अन्य उपचारांसोबत किंवा एकमात्र उपचार म्हणून याचा वापर करता येतो. कुठल्याही उपचार पद्धती बद्दल अभिनिवेश किंवा आकस न बाळगता, त्या क्षेत्रातील तज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा. सुदैवाने आज योगाबद्दल समंजस भूमिका ठेवणारे वैद्यक व्यावसायिक बर्‍याच प्रमाणात उपलब्ध असल्याने यात अडचण येऊ नये.
कमी कालावधीच्या आजारात व बाल, तरुणांमध्ये योगाचे लाभ तूलनेने लवकर होतात, अन्य व्याधींमध्ये, वरिष्ठ वयोगटात अधिक वेळ लागू शकतो हे लक्षात ठेऊन निष्ठेने, चिकाटीने, सातत्याने व योग्य त्या गतीनेच अभ्यास सुरू ठेवावा. सर्वच व्यक्तिंना, सर्वच व्याधींमध्ये लाभ होईलच असे नाही हे लक्षात ठेवावे. त्यामुळे लाभ होतो आहे की नाही, काही त्रास होतोआहे का हे पाहून त्यानुसार योगाभ्यास चालू ठेवावा, त्यात बदल करावा की तो बंद करावा हे योग तज्ञ व वैद्यक व्यावसायिक यांच्याशी चर्चा करून ठरवावे.
योगशास्त्राचा अंगिकार योग्य पद्धतीने, व्यापक प्रमाणात व्यवहारात आला तर भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशालाही ते ‘सर्वे सन्तु निरामय:’ किंवा ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे लक्ष्य गाठण्यासाठी वरदान ठरू शकते. आज जगभर अंगिकार होत असलेल्या शास्त्राची आपल्याच देशातील उपेक्षा थांबली तर आमची निरामयाच्या मार्गावरची वाटचाल योग्य त्या दिशेने गतिमान होईल.

बदललेल्या जीवनशैलीमध्ये योगाची उपयुक्तता लेखमाला समाप्त.

 

Vote: 
No votes yet
Language: