शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम ही अष्टांग योगाचे दुसरे अंग आहे.

शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम ही अष्टांग योगाचे दुसरे अंग आहे.

शौच म्हणजे शुचिता, स्वच्छता purity, cleanliness. ही स्वच्छता शारीरिक पातळीवर असते तशीच मानसिक पातळीवरही असते. शारीरिक व मानसिक शुचिता आहारावरही अवलंबून असते. हा आहार शरिराच्या स्थितीनुसार तसेच आपण करीत असलेल्या कामानुसार हवा, तो सात्विक हवा. 
मानसिक शुचितेसाठी भौतिक आहाराबरोबरच मानसिक आहारही सात्विकच हवा. मानसिक आहार म्हणजे श्रवण, वाचन, संभाषण, मैत्री इ. त्यामुळे चित्तातील राग, द्वेष इ. मळ दूर होतात. शौच नियमाच्या परिपूर्ण पालनासाठी वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालनही आवश्यक आहे.

संतोष म्हणजे मनाची स्वस्थ, प्रसन्न समतोल अवस्था. जीवनामध्ये जे काही घडते ते प्रसन्नपणे समाधानाने स्विकारणे म्हणजे संतोष. Contended acceptance of one’s lot in life. दैनंदिन जीवनात आपण उकाडा, गाडीला झालेला उशीर अशा असंख्य क्षुल्लक गोष्टींसाठी त्रागा करतो, असंतुष्ट होतो. राग, द्वेष, अभिनिवेशापासून मुक्त होऊन मनाची सुसंवादी अवस्था टिकवत वस्तुस्थितीचा समाधानाने (नाईलाजाने नाही) स्विकार हा खरा संतोष आहे.

तप म्हणजे उष्ण होणे, प्रकाशणे, उत्कट-संवेदनशील होणे. टोकाच्या संवेदनांसाठी शरिराला तयार करणे, मनाला व शरिराला नियंत्रित व सहनशील करणे. स्वामी निरंजनानंद म्हणतात सुवर्ण जसे अग्नितून तावून, सुलाखून बाहेर पडते, तसे स्वत:ला साधनेसाठी तयार करणे.
तपाचे गुणानुसार सात्विक, राजसी व तामसी असे प्रकार पडतात. तपाचे कायिक, वाचिक व मानसिक असेही प्रकार आहेत. शारीरिक क्रियांवर शास्त्रविहीत मार्गाने नियंत्रण मिळवणे म्हणजे कायिक तप आहे. सत्य, हितकर, प्रिय बोलणे व अप्रिय बोलावे लागलेच तर सौम्यपणे व सुह्रुद भावनेने बोलणे हे वाचिक तप आहे. शांत, प्रसन्न, आत्मनिग्रहपूर्वक वृत्तीने राहाणे व सदैव दुसर्यां चे हितचिंतन, अभिष्टचिंतन करणे, कोणाचेही अनिष्ट न चिंतणे म्हणजे मानसिक तप आहे.

स्वाध्याय याचा अर्थ सामान्यपणे शास्त्रग्रंथांचा अभ्यास असा घेतला जातो. पण स्वाध्याय याचा खरा अर्थ स्वत:चे अध्ययन, स्व-रुपाचा अभ्यास, आत्मावलोकन, आत्मपरिक्षण असा आहे. Self analysis, analysis of one’s strength and weakness. साधनेच्या मार्गावर प्रगती होण्यासाठी साधकाने सातत्याने असा अभ्यास करणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी ही आत्मदर्शनाची योग्यता उत्पन्न होण्यासाठी सहाय्यभूत अशा शास्त्रग्रंथांचे अध्ययन करणे आवश्यक आहे.

ईश्वर प्रणिधान: अविनाशी अशा ईश्वर तत्वाचे सतत अवधान ठेऊन जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ईश्वर प्रणिधान या नियमाचा अभ्यास आहे. ईश्वरेच्छा बलीयसी असे आपण म्हणतो, पण त्यात खर्या् ईश्वर शरणतेपेक्षा नाइलाजाने किंवा सोयीस्करपणे परिस्थितीचा स्विकार असतो. एक गुरू रोज रात्री झोपण्यापूर्वी “ईश्वरा तुझी कृपा अपार आहे” असे म्ह्णून धन्यवाद देत असत. एकदा असे झाले की दिवसभर उन्हात प्रवास झाला, वाटेत कोणी जेवणाचे तर सोडाच पण पाणीही विचारले नाही. त्या दिवशीही रात्री झोपण्यापूर्वी “ईश्वरा तुझी कृपा अपार आहे” असे म्ह्णून गुरूंनी ईश्वराला धन्यवाद दिले. शिष्यांना फार आश्चर्य वाटले. जो दिवस सुखात गेला त्यादिवशी असे म्हणणे ठीक आहे, पण आजचा दिवस इतका त्रासात गेला तरी आपण असे कसे म्हणता ? गुरू म्हणाले “आपली साधना मार्गावर प्रगती व्हावी अशीच ईश्वराची योजना असते. सुख असो वा दु:ख दोन्हीची योजना त्यासाठीच असते. म्हणून आजचेही अनुभव त्या दृष्टीनेच स्विकारले पाहिजे. म्हणूनच आज रात्रीही “ईश्वरा तुझी कृपा अपार आहे” असे म्ह्णून मी धन्यवाद दिले”. सामान्यत: माणूस सुखाच्या प्रसंगी आनंदाने हुरळून जातो व दु:खाच्या प्रसंगी व्याकुळ होतो, आणि दोन्ही प्रसंगातून जे शिकण्याची संधी मिळाली असते ती वाया घालवतो. सुख व दु:ख दोन्हीही ईश्वराचा प्रसाद आहे असे जाणून साधनामार्गावर चालत राहाणे म्हणजेच ईश्वरप्रणिधान.

योग म्हणजे व्यायाम नव्हे, तसेच केवळ काही वेळ करण्याची साधना नव्हे, तर योग म्हणजे एक जीवन पद्धती आहे. आजच्या सामाजिक समस्या मुळातून दूर करायच्या असतील तर यम नियमात सांगितलेल्या गुणांची व अनुशासानाची जोपासना सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात करावी लागेल. योग साधनेतून साधकाला सामर्थ्यही प्राप्त होते. या सामर्थ्याचा त्याने दुरूपयोग करू नये म्हणून मनाची योग्य मशागत करणार्याप यम नियम या अंगांची योजना अष्टांग योगाच्या प्रारंभी केलेली आहे. प्रत्येक योगसाधकाने हे जाणून यम नियमांचा मन:पूर्वक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Vote: 
No votes yet
Language: