साधनपाद

साधनपाद

साधनपादाच्या 55 सुत्रांपैकी 1 ते 28 सुत्रात क्रियायोग, क्लेष, अविद्यानाश व कैवल्यप्राप्ती इ. चे विवेचन आहे. 29 ते 45 सुत्रात अष्टांगयोगाचे सूत्र व यमनियमांचे विवेचन आहे. 46 ते 48 आसनांशी व 49 ते 53 प्राणायामाशी संबंधित सुत्रे आहेत.
सुत्रांची सुरूवात सामान्यपणे ‘अथ’ पासून होते व शेवट ‘इति’ ने होतो. म्हणून पातञ्जल योगसुत्रांची सुरुवात ज्या सुत्रापासून होते ते सूत्र आहे
अथ योगानुशासनम् समाधिपाद 1
अथ याचा अर्थ श्री. कृष्णाजी केशव कोल्हटकर (भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शन) व श्री. नानाभाई सदानंदजी रेळे (पातञ्जल योगदर्शन) यांनी मंगलाचरण असा केला आहे तर परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वतींनी (मुक्तीके चार सोपान) अथ म्हणजे आता असा अर्थ लावून योगसुत्रांच्या संदर्भात आता म्हणजे कर्मयोग व भक्तियोगाच्या अभ्यासानंतर असा केला आहे.

अनुशासन याचा अर्थ परिपूर्ण शासन. शासन म्हणजे व्यवस्था/आदेश/सूचना/उपदेश असा योगशास्त्राचे ज्ञान या अर्थाने बहुतेकांनी केला आहे. ओशोंच्या मतानुसार शासन म्हणजे आंतरिक व्यवस्था.
कोल्हटकरांनी भारतीय परंपरेत कुठल्याही शास्त्राचे अध्ययन करतांना ज्या अनुबंध चतुष्ट्याचा विचार करण्याचा प्रघात आहे त्याचा उल्लेख केला आहे. हे अनुबंध चतुष्ट्य म्हणजे त्या शास्त्राचे अध्ययन करण्यासाठी अधिकारी कोण, त्या शास्त्राचे प्रयोजन काय, त्या शास्त्राचा विषय काय व या तिघांचा परस्पर संबंध काय या चार बाबी होत. 
या दृष्टीने योगसुत्रांच्या संदर्भात जीवनातील तापत्रयाने त्रासलेला, त्यातून मुक्त व्हावे अशी तीव्र इच्छा असलेला, योगशास्त्राची जिज्ञासा असलेला व कर्माचरणाने चित्तशुद्धी झालेला मुमुक्षू साधक हा या शास्त्राचे अध्ययन करण्यासाठी अधिकारी आहे. जेंव्हा जीवनात आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांची अर्थहीनता, निरर्थकता जाणवू लागते, निराशा दाटून येते,
‘निकले थे कहां जाने के लिये, पहुचेंगे कहां मालूम नही,
राह में भटके मुसाफिरको, मंजिल का निशां मालूम नही.’ 

अशी अवस्था निर्माण होते, कुतुहल, जिज्ञासेच्या पलिकडे जाऊन जिवावर उदार होऊन सत्य जाणण्याची तीव्र मुमुक्षा उत्पन्न होते तेंव्हा- अथ –योगशास्त्र शिकण्याची, जाणण्याची पात्रता निर्माण होते. एकदा एका तिबेटी गुरूकडे एक शिष्य सुदूरच्या सिंकियांग प्रांतातून आला, गुरूने त्याला तिथल्या बाजारातील तांदुळाचा भाव विचारला, शिष्याने माहित नाही म्हणून सांगितले. गुरूच्या लक्षात आले की याला सांसारिक जीवनात काही रस नाही व सत्य जाणण्याची तीव्र इच्छा त्याच्या अंत:करणात जागी झाली आहे व सत्य जाणण्याला तो पात्र आहे. योगशास्त्राचे प्रयोजन कैवल्याची प्राप्ती हे आहे तर योगाचे स्वरूप, साधने व फळ इ. चे प्रतिपादन हा योगाचा विषय आहे. योगाचा अधिकारी योगशास्त्राचे ज्ञान करून घेत असतो म्हणून ज्ञाता व हे शास्त्र त्याला ज्ञेय आहे, या अर्थाने त्यांच्यात ज्ञातृ-ज्ञेय संबंध आहे, योग हा या शास्त्राचा प्रतिपाद्य विषय आहे व हे शास्त्र त्या विषयाचे प्रतिपादक आहे व हे शास्त्र कैवल्य ह्या प्रयोजनाची प्राप्ती करून देत असल्याने त्याच्याशी या शास्त्राचा प्राप्य-प्रापक संबंध आहे.

Vote: 
No votes yet
Language: